Search AbideInSelf

Total Pageviews

Monday, November 23, 2009

अभ्यास का बोध..?

अभ्यास सकारण आहे, तर बोध अकारण !
अभ्यासात प्रयास आहे, उद्देश आहे, तर बोध सहज, अनायास आहे !
अभ्यासात बोधाची अनुपस्थिती आहे, तर बोधामध्ये 'अभ्यासक'च अनुपस्थित आहे !
अभ्यासात अभ्यासक, अभ्यासलेले आणि अभ्यास असे तीन आहेत,
तर बोधात फक्त बोध ....आत्मबोध आहे !
अभ्यासात शोध, शोधणारा आणि शोध्य आहेत, तर बोधात शोध घेणाराच अनुपस्थित आहे !
अभ्यासात स्थित्यंतर, मध्यंतर आणि पाठांतर आहे, तर बोध हा पाठांतराविना निरंतर आहे !
अभ्यासात लक्ष आहे, तर बोध स्वयंभू अलक्ष आहे !
अभ्यासात श्रवण, वाचन, चिंतनाचा आधार आहे, तर बोध स्वयं, निरंजन... निराधार आहे !
अभ्यासात विस्मरणाचे भय आहे, तर बोधात 'बोध आहे' ह्याचेदेखील विस्मरण आहे !
अभ्यासाची पार्श्वभूमी आहे द्वैत, तर बोध म्हणजे 'भूमिहीन' अद्वैत....!
अभ्यास एक उप-स्थिती आहे, तर बोध ही स्थितीहीन 'कायम' स्थिती आहे !
अभ्यासात कुलूप आहे पण किल्लीचा मात्र शोध आहे,
तर बोधात कुलूप आणि किल्ली, दोन नाहीत हा स्पष्ट बोध आहे !

 सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम
२३ नोव्हेंबर २००९

English translation of this post:

Seeking or the Understanding ?
http://abideinself.blogspot.in/2010/07/seeking-or-understanding.html