ढग खाली पडू शकतो... येऊ किंवा जाऊ शकतो,
पण आकाश कोठे आणि कसे पडणार?
लाट खाली पडू शकते... येऊ किंवा जाऊ शकते,
पण समुद्र कोठे पडणार आणि कोठे जाणार?
ठिणगी खाली पडू शकते... येऊ किंवा जाऊ शकते,
पण अग्नी कोठे आणि कसा पडणार?
सर्व भीती आकाराला... सर्व चिंता आकाराला...
उदय आकाराला...अस्त आकाराला...
शोधाची गरज आकाराला... क्रोधाची भीती आकाराला....
श्रद्धा आकाराला.... संशय आकाराला....
आकाराला दिसू शकतो फक्त आकार...
आकाराच्या व्याख्येमध्ये 'निराकार' कसा बसणार?
ह्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आग्रह नाही....
'ग्रह' मिटल्यावर कोठला आग्रह?
वाटले तर लिहा अन्यथा नाही....
काही प्रश्नांची उत्तरे नसतात...
काही प्रश्नांची उत्तरे प्रश्नातच असतात तर…
काहींची उत्तरे प्रश्नकर्त्याच्या विसर्जनातच असतात..... :-)
जय गुरु
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
११ जून २०१२
www.abideinself.blogspot.com
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.