अद्वैत्-वेदांताची अंतिम शिकवण देणारे श्री निसर्गदत्त महाराजांच्या १९७९ ते १९८१ दरम्यानच्या अप्रकाशित निरुपणांवर आधारीत
'आत्मप्रेम' हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे.
'आत्मप्रेम' पुस्तकातील काही निवडक अंश आपणाला येथे वाचायला मिळतील. श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण आत्मसात करण्यासाठी अथवा स्वत:ला स्वत:ची खरी ओळख होण्यासाठी,
'आत्मप्रेम' पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरू शकते. येथे सोबतच पुस्तकाची प्रस्तावनाही वाचायला मिळेल.
'आत्मप्रेम' हे संग्रहणीय पुस्तक श्री रवींद्र कात्रे ह्यांच्याकडे तसेच काही निवडक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. रवींद्र कात्रे, पुणे (संपर्क): ९५५ २५२५ ४३१
Email:
rbkatre@gmail.com /
abideinself@gmail.com
'आत्मप्रेम' पुस्तकातील निवडक अंश:
०१) आपण व्यवहारात असूनही 'वेगळे' आहोत असे जाणून शांत स्थिर रहा!
आपण असल्याची जाणवती जाणीवकळा सहन होत नाही म्हणून लोक हा सारा व्यवहार करतात. नानाप्रकारची करमणूक होते, स्वतःपासून पलायन करण्यासाठी. एकांतात बसून स्वतःकडे पहात राहून स्वतःला सामोरे जाणे हे सर्वात मोठे शौर्य आहे. आज जी माणसे आहेत त्यांच्यापे़क्षा मेलेल्या माणसांची संख्या केवढी मोठी? त्यांचे कोट्यवधी माणसांचे वजन कोठे गेले? ती काय करत असतील? याचे उत्तर... ती जन्माला येण्यापूर्वी जशी होती तशीच आहेत.
- श्री निसर्गदत्त महाराज
*****
०२) हे गहन आहे पण कळले तर सोप्पे आहे!
आपणाकरिता आपली गरज काय, तिचा उपयोग काय याचा येथे निवाडा होतो. येथे भूत-भविष्य सांगितले जात नाही.
जेवढे कळते तेवढे निघून जाणार आहे. प्रत्येकाला आपण असावेसे वाटते. पण ते चिरकाल टिकत नाही. आपले गुप्तपण, आपली योग्यता सहसा कोणी उघड करून सांगत नाही. दिसते तसे आपण नसून पहातो तसे आपण आहोत. आपण मरणार ही आपली खात्री आहे ती खोटी आहे. गोचर अगोचर होईल. आपण अगोचर आहोत. पाणी आटले, दिवस मावळला, बत्ती विझली म्हणजे मेली नाही. मृत्यु शब्दाचा हा अर्थ घ्या. जेवढे कळते तेव्हढे गळते. ज्याला कळते तो शांत आहे. आपण मरणार नाही पण जे गोचर झाले आहे ते अगोचर होणार, दिसणार नाही. या अगोचरालाच देव, ब्रह्म इत्यादी नावे दिली गेली आहेत. सगळा नामाचा बाजार आहे. नावानेच सगळा व्यवहार चालतो आहे. आपल्या आठवणीला आपल्या गुरुने दिलेला देव समजून आकाररहित भजा. सर्व व्यवहार म्हणजे केवळ करमणूक. या वयात ही करमणूक, त्या वयात ती करमणूक, प्रत्येक वयात वेगवेगळी करमणूक होते.
- श्री निसर्गदत्त महाराज
*****
आत्मप्रेम:
प्रस्तावना -
नितीन राम
तुम्ही स्वतःला जे समजता, स्वतःला जे काही म्हणून ओळखता त्याच्या पलिकडे तुम्ही किंवा कोणीही सदगुरुला ओळखू शकत नाहि. तुमच्या ठिकाणी तुमची ओळख जर 'मी देह' अशीच असेल तर सदगुरुही तुम्हाला देहधारी व्यक्ती इतकेच दिसेल. सदगुरु म्हणजे सर्वस्व... सर्व-स्व... सर्वच-स्व! निसर्गदत्त म्हणजे हेच हे सर्वस्व...स्वरूप... निरंजन... निरंतर... निरावलंब… स्वरूप. निसर्गदत्त म्हणजे अनंत, अखंड, अबाधित परमात्म स्वरूप… जे माझे, तुमचे आणि प्रत्येकाचेच कायम स्वरूप आहे.
नदीला कधी तहान लागते का! नदीला कधी कुठे थांबावेसे वाटते का! नदीला कळत पण नाही कि ती कशी कोठे आणि का वाहते आहे. तशीच काहिशी हि अवर्णनीय अवस्था आहे ज्यात कळतेपण पण नाही आणि अकळतेपण पण नाही. जेव्हा जे जे हवे आहे ते ते सहजपणे येते आहे किंवा जाते आहे. येणारे पण आपण नाही आणि जाणारेपण आपण नाही. आहे काय तर फक्त जाणार्या आणि येणार्या चे जाणतेपण! जे कधीच कोठुनही आलेले नाही आणि कधीच कोठे जाणार पण नाही. जे जे येते आहे किंवा जाते आहे असे दिसते आहे, ते ते... तो तो... सर्व भ्रम...आभास! केवळ क्षणिक आभास.... मग हा क्षण कधीतरी पन्नास वर्षांचा असेल तर कधीतरी शंभर वर्षांचा. पण आपले स्वरूप जे सत्य-नित्य आहे ते ह्या छोट्या-मोठ्या क्षणांवर कदापिही अवलंबून नाही. ते आहे निरंजन... निरावलंब... निरंतर. सद्गुरुंची कृपा आहे...जी अनंत आहे… अव्यहत आहे… वाहतेच आहे... आणि त्याचेच दुसरे नांव आहे "स्वरुप".
ह्याच आपल्या कायम स्वरुपाची सत्य-नित्य ओळख करून घेणे हेच आध्यात्माचे वास्तविक प्रयोजन.
विश्वामधे अनादी कालापासून...संत परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येक कालानुसार अनेक स्वरुप ज्ञानी संतांचे अवतरण झालेले आहे. सर्वसामान्य प्रापंचिकांना त्यांनी परमार्थाच्या वाटेवर पदोपदी मार्गदर्शन केलेले आहे. प्रपंचात राहून परम-अर्थाचा बोध झालेले अनेक स्वरुप ज्ञानी आपल्याला माहीत आहेत. याज्ञवल्कऋषी, जनक राजा ह्या प्राचीनकाळातील आत्मज्ञानी सत्पुरुषांपासून अगदी अलिकडील संत गोराकुंभार, संत एकनाथ, तुकाराममहाराज, गोंदवलेकर महाराज असे अनेक संत आपल्याला परिचित आहेत. समर्थांनी तर..."प्रपंच करावा नेटका" हा..स्पष्ट संदेशच देउन ठेवला आहे. अशा या अनंत संत परंपरेमधील विसाव्या शतकातील एक स्वरुपज्ञानी संत म्हणजे नाथपंथातील ईंचगिरी संप्रदायाचा वारसा लाभलेले सदगुरु श्री निसर्गदत्त महाराज.
सदगुरु श्री निसर्गदत्त महाराज (१८९७-१९८१) देहरुपाने मुंबईमध्ये राहिले आणि हजारो देशी-विदेशी साधकांशी त्यांनी त्यांच्या खेतवाडीतील निवासातून सुखसंवाद साधला. अनेकांची त्यांच्यावर प्रिती बसली आणि ते स्वगृहात जागे झाले. अनेकांनी त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरातून संवाद साधला आणि आपले शंका-निरसन करून घेतले.
हे
आत्मप्रेम आहे तरी काय? श्री निसर्गदत्त महाराजांच्याच स्पष्ट शब्दात येथे पाहूयातः
"प्रेम हे नाव नव्हे, प्रेम हा शब्द नव्हे...प्रेम हे आपण असल्याचे ज्ञान आहे आणि त्याची तुम्हाला आवड आहे. आपण असल्याचे ज्ञान म्हणजे प्रेम आहे त्याची तुम्हाला आवड आहे आणि ती आवड सहवासाला ठेवण्याकरता नाना सायास करावे लागताहेत. या जगामध्ये जो व्यापार चाललेला आहे तो आपण असल्याची प्रेमाची आवड सहवासाला ठेवण्याकरिता. ती सहवासाला राहणार नाही हे माहिती आहे; तरि पण ती आवड सहवासाला ठेवण्याकरिता हे सर्व व्याप करावे लागतात. .....हेच ते आत्मप्रेम."
"तू असलेल्या प्रेमाला ब्रह्म नाव आहे. तू असल्याचे प्रेम हे जग म्हणून आहे. तू आहे हे प्रेम ह्याला सगळी नावे आलेली आहेत. ते जे प्रेम वावरले त्याची ख्याती, किर्ती आणि इतिहास निर्माण झालेला आहे. आपण असल्याचे प्रेम हेच ईश्वराचे ईश्वरतत्व, ब्रह्माचे ब्रह्मतत्व्...केवळ ब्रह्म."
"तुला या जगामध्ये तू असलेल्या प्रेमाशिवाय काय आवडते ? तू असल्याचे प्रेम आवड्ते म्हणून सगळे काही आवड्ते. तू असल्याचे प्रेम ही प्रबळ इछा, ही प्रबळ वासना, ही प्रबळ आशा...तेच ते आत्मप्रेम. तर आशा, इच्छा, वासना कोणाकरिता आहेत ते बघ, तू नसलास तर. स्वतःची इछा, स्वतःची आशा स्वतःचे प्रेम हे उघड झाले पहिजे."
"तू देहाला धरून बाहेरच्या विषयावर आशा, इच्छा, वासना मागतो आहेस्. तुझी आशा कर, तुझी इच्छा कर. न वांछीता आहे त्याची वासना काय आहे तर आपण पाहिजे", मी हयात पाहिजे". तू स्वतः सुखाचा आगर आहेस, तू सुखाचा सागर आहेस......पण तू त्याच्यामध्ये पोहोचशील तेव्हा. देहाच्या ओळखीने ज्या काही मागतोस....आशा, इच्छा, वासना...ती सगळी अधोगती... आणि स्वत:करता मागशील ती उर्ध्वगती.....ती पूर्णगती!"
येथे प्रत्येक जण काहितरी नक्की शोधतो आहे. काय बरे शोधतो आहे प्रत्येक जण! कोणी धन तर कोणी पद, कोणी तृप्ती तर कोणी अमरत्व, कोणी सुख तर कोणी आनंद, कोणी शांती तर कोणी शाश्वतता, कोणी निशंकता तर कोणी समाधान! तुम्ही त्याला संज्ञा काहीही द्या पण प्रत्येकाचा शोध मात्र चालूच आहे. ह्या सर्व संज्ञांकडे जर प्रज्ञेने पाहिले तर लक्षात येते कि प्रत्येक व्यक्ती फक्त एकच "वस्तु" शोधत आहे. सर्व-सामान्यपणे सुख, शांती, समाधान येते आणि काही क्षणात नाहिसे पण होते. वरकरणी काहिही दिसले तरी प्रत्येकाचा शोध हा शाश्वततेचा, परम-तत्वाचा आहे. प्रत्येकाचा शोध हा आपल्याच मूळ स्वरुपाचा आहे. ह्या शोधामागचे खरे कारण काय बरे असावे? सर्वात मूळ कारण म्हणजे बहुतांश साधकांची आपण व्यक्तीरुप आहोत ही दृढ धारणा! दुसरे कारण म्हणजे आपण अपूर्ण आहोत ही धारणा. तिसरे कारण म्हणजे आपण अस्तित्वापेक्षा वेगळे आहोत ही धारणा. आणि अनुषंगाने चौथे कारण म्हणजे पूर्णतेसाठी किंवा एकरुपतेसाठी "मी काहीतरी करायलाच पाहिजे" ही एक धारणा.
प्रत्येक साधकाच्या विविध अशा पारमार्थिक धारणा, संकल्पना, मान्यता असतात. ह्या धारणांच्या आधारावरच ज्याचा-त्याचा तथाकथित पारमार्थिक शोध चालू असतो. प्रस्थापित धारणांना शक्यतो धक्का लागू न देता शोध घ्यायचा असा बहुतांश साधकांचा आटोकाट प्रयत्नही असतो. हा शोध अनेक मार्गांने, साधनांद्वारे चालू असतो. कोणी ग्रंथ, शास्त्र, पुस्तक, वचने ईत्यादी वाचन करतो तर कोणी नित्यनेम, जप-तप, ध्यान, योग अशा अनेक क्रिया अनुसरतो. अधिकतर साधकांचा 'क्रियेवर, आलंबनावर', साधण्यावर' विश्वास असतो तर फारच थोड्या साधकांची 'मी कर्ता' ह्यावरच दाट संशय असतो. येथे व्यक्ती तितक्या प्रकृती, जितक्या प्रकृती तितके दृष्टीकोन आणि जितके दृष्टीकोन तितके अंगुलीनिर्देष. (Pointers)
श्री निसर्गदत्त महाराजांकडे अशाच विविध प्रकृतींचे साधक येत आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या स्वभावाला अनुसरुन अंगुलीनिर्देष होत असे. भक्तिमार्गी, ज्ञान-जिज्ञासू अशा सर्वांना मुंबईतील त्यांच्या छोटेखानी आश्रमात मुक्त प्रवेश होता. सर्वसामान्य नोकरदारांपासून प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, उच्च शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी अशा सर्व थरातील जिज्ञासू त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत. श्री महाराज नेहमीच, अद्वैताच्या स्थिर बैठकीवरून आणि फक्त स्वानुभुतीच्या आधारावर स्वरुप-ज्ञान सांगत. अगदी संक्षेपात सांगायचे तर त्यांची शिकवण म्हणजेच "निसर्ग-योग" आणि त्याचे मूल्-सूत्र म्हणजे...
"स्व्"ला जाणा आणि "स्व"स्थ व्हा."
१९७८ ते १९८१ ह्या दरम्यान श्री निसर्गदत्त महाराजांचा देशी-विदेशी साधकांबरोबर झालेला संवाद येथे
'आत्मप्रेम' मध्ये आपल्याला वाचायला मिळेल. श्री महाराज साधकांना प्रामुख्याने दोन स्तरांवर मार्गदर्शन करत. श्री महाराज त्याला पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष म्हणत. "आत्मप्रेम" वाचताना साधक मित्रांनी हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. एक साधक आहे ज्याची आपण फक्त देहरुप आहोत ही दृढ धारणा आहे, ज्याचे देह-आकाराशी पूर्ण तादात्म्य आहे; त्याच्यासाठी त्याच्या धारणेला अनुसरुन पूर्वपक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे. जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ही पण एका अर्थाने अध्यात्माचा पूर्वपक्षच आहे. पूर्वपक्षातील साधकांसाठी श्री महाराजांनी मंत्रदिक्षा दिली, ध्यानयोग साधायला प्रोत्साहन दिले. साधकाची सर्वच्या सर्व दु:ख आणि त्रास त्याच्या केवळ देह तादात्म्यामुळे असल्याने ते तुटण्यासाठी श्री महाराजांनी सुरवातीच्या तीस वर्षात जे अव्यहत ज्ञान वाटले ते सर्व बहुतांशी पूर्वपक्षातले. हे
पूर्वपक्षातील ज्ञान श्री महाराजांच्याच शब्दात येथे पाहुयात:
"देह तुझे रूप नव्हे तर कायेमध्ये असलेली "आपण आहे" ही जाणीव, शब्दाविरहीत "शुद्ध असणेपण", कायेमध्ये असलेले मात्र केवळ ज्ञान...ते 'ज्ञान तुझे रूप' आहे. तेच जणू जगदात्म होउन राहीलेले आहे. तू असलेले ज्ञान जिथे नसेल, तिथे जगाचाही अनुभव नसेल तर तू असल्याचे ज्ञान आहे हेच तू आहेस... ऐकल्याप्रमाणे ते ध्यानात ठेव...त्याचे ध्यान कर....ते ध्यानात धर. पण काय धरशील तर "तू आहेस हे ज्ञान". त्या ज्ञानाने, ज्ञानाला आपल्या ध्यानात ठेवावे. ऐका !!! त्या ज्ञानाने, ज्ञानाला आपल्या ध्यानात ठेवावे. हे ज्ञान हाच ईश्वर आहे, ह्या ज्ञानापलिकडे अजून कोणताही ईश्वर नाही म्हणून तू ह्या ज्ञानाचीच पूजा कर, भक्ती कर."
"मी आहे ही जाणीव हाच देव, हाच ईश्वर, तीच माया. माया म्हणजे देवाची शक्ती. देवाची जेवढी नावे आहेत ती 'आपण आहे' ह्या जाणीवेचीच. पण देह म्हणजे आपण नव्हे हे पक्के ठसले गेले पाहिजे. हे साधकाचे लक्षण."
"कायेत जे आत्मप्रेम निर्माण झालेले आहे तोच ईश्वर. ते आत्मप्रेम प्रसन्न होण्याकरता त्यालाच गुरु, ज्ञान, भक्ती असे म्हणून भजा. तुमचे आत्मप्रेम तुमच्या ध्यानात येण्यासाठी गुरुचे ध्यान केले पाहिजे, त्या आत्मप्रेमालाच गुरु मानून. आत्मप्रेमावेगळे अवतारी, माया, ब्रह्म दुसरे नाही."
"ध्यानयोग साधा. मी देह नव्हे, मी केवळ शुद्ध ज्ञान आहे या निश्चयाने रहावे. मग आतूनच ज्ञानाचा झरा वाहील."
"नामस्मरणाने प्राण शुद्ध होतो. प्राण शुद्ध झाल्यावर मन शुद्ध होते व मग सत्व शुद्ध होते. हे सत्व मग आपली सगळी हकिकत सांगते.”
पूर्वपक्षातील साधकांची देहरुप म्हणजेच आपण हि दृढ श्रद्धा, कार्यकारणावर असलेली श्रद्धा पाहून श्री महाराजांनी त्याला विविध आलंबने दिली. जो पर्यंत साधकाच्या ठायी 'मी आहे' ह्या सहज स्फुरलेल्या जाणीवेबरोबर 'मी वेगळा' आहे हे भान आहे तो पर्यंत त्याला कोठल्याही क्रियेचे आकर्षण आहे, काहितरी मिळवायची चिंता आहे, कोठेतरी पोचायचे आहे आणि तोपर्यंत त्याला विविध साधने आणि आलंबने दिलेली आहेत.
दुसर्या स्तरावरील एक साधक आहे ज्याची कोणत्याही साधनेद्वारे असो अथवा अवचितच पण स्वत;च्या अनुभवातून "देह आपण" ही श्रद्धा ढळलेली आहे किंवा आपले देहरुप हे आपले मूळस्वरूप नाही हे ज्याला उमजलेले आहे, त्याच्यासाठी उत्तरपक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे. कृष्णाने उद्धवाला सुरवातीला पूर्वपक्षातले ज्ञानमार्गदर्शन केले आणि एक वेळ अशी आली कि कृष्णाने हे जे आत्तापर्यंत उद्धवाला दिलेले ज्ञान होते ते विसरून जायला सांगितले. स्वाभाविकपणे उद्धव बेचैन झाला, अस्वस्थ झाला आणि मग त्याला कृष्णाने अंतिम म्हणजेच उत्तरपक्षातील ज्ञान (अंगुलीनिर्देष) दिले आणि उद्धव कायमचा मोकळा झाला. उद्धवाला कृष्णाने दिलेल्या उत्तर पक्षामधील ज्ञानाबरोबर त्याचे कृष्णावर निस्सिम प्रेम व अपार श्रद्धा होती हे पण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. ह्या प्रेमाच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या नैसर्गिक वंगणामुळे कृष्णाने दिलेल्या अंतिम ज्ञानाबाबत विवेक करणे उद्धवाला सहज आणि सुलभ झाले.
अंतिम अवस्थेत जर ज्ञानातून शुद्ध प्रेम उपजत नसेल तर ते ज्ञान केवळ शाब्दीकच ज्ञान ठरते आणि ते साधकाला कायमचे मोकळा करण्यास असमर्थ ठरते. ज्याप्रमाणे प्रेमाची पूर्णता हे आत्मज्ञानाचे अवतरण त्याचप्रमाणे ज्ञानाची पूर्णता म्हणजे शुद्ध प्रेमाचे अवतरण. पूर्वपक्षामधे जरी ज्ञान व प्रेम हे दोन्ही वेगळे घाट, मार्ग दिसत असले तरी उत्तरपक्षामध्ये हे दोन्ही आपल्याच स्वरुपाचे अविभाज्य अंग म्हणून उघड होतात आणि त्यांमधील भासमय द्वैत सहजच विरून जाते.
उत्तरप़क्षामध्ये सर्व काम फक्त विवेकाचे आहे. श्री महाराजांच्याच भाषेतः
"जे जे तुम्ही नाहि ते नाहिसे करा. येथे क्रियाधर्माचा संबंध नाही. भगवतगीतेमधे योगाभ्यास सांगितलेला आहे पण अर्जुन व उद्धव यांना तो करावा लागला काय? अर्जुन व उद्धव ऐकता ऐकताच ज्ञानी झाले कारण सांगणार्याग कृष्णावर त्यांची खरी प्रिती होती. इतर लोक क्रिया, साधना यांमध्ये गुरफटून जातात."
"तुमच्याकरता तुम्ही म्हणून काय आहात या एकाच गोष्टीचा विचार करा. दुसर्यांचा करू नका. तुम्हाला तुम्ही असल्याची कल्पना का व केव्हा झाली याचा विचार करा.'
"तीव्र बुद्धीचा कोणी असेल तर नुसत्या श्रवणानेही अल्पकाळात मुक्त होतो."
"जो जो अनुभव येतो, जगाच्या अनुभवासहित या अनुभवांचा कर्ता-करवीता कोणीही नाही. आपोआप सर्व होत आहे."
"खरोखर वस्तुस्थिती काहिच नाही. ज्याला शेंडा ना मूळ त्याला वस्तूस्थिती कसली? तरीपण आपापल्या कल्पनेप्रमाणे लोक काहितरी साधना करत राहतात. उगी राहता येत नाही म्हणून या सार्या गोष्टी अंगावर ओढून घ्याव्या लागतात."
"आमच्याकडे येऊन कोणी पाच-सहा वाक्ये जरी ध्यानात ठेवली तरी त्याला आणखी काही परमार्थ करायला नको."
"पुष्कळ वाचलेत, पुष्कळ ऐकलेत. आता वाचणार्याची, ऐकणार्याची सत्य-नित्य ओळख करून घ्या."
"मी आहे" ही जाणीव आल्यापासूनच हा खटाटोप चालू झालेला आहे. सुखदु:खांची जाणीवसुद्धा मी असल्याच्या जाणीवेमुळेच होते आहे. सर्वात लबाड काय असेल तर ती ही जाणीव आहे. कारण हि जाणीव म्हणजे देहअन्नाच्या रसातील सत्त्वगुण आहे. आणि त्यामुळे ही जाणीव कालधर्मी आहे, हंगामी आहे. आपण आहे असे कळते आहे पण कळते आहे ते आपण नव्हे, ज्याला कळते आहे ते आपण. जाणीव ज्याला जाणवते आहे ते आपण. जाणीवेने जेवढे जाणवते आहे तेवढे जाणीवेसहीत जाणार आहे, पण जाणीवेचा "जाणता" जाणार नाही."
या ठिकाणी पाहिले तर लक्षात येइल कि पूर्वपक्षातील आणि उत्तर पक्षातील श्री महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये स्वाभाविक विरोधाभास दिसून येतो. पूर्वपक्षामध्ये साधकाचे देहतादात्म्य तोडणासाठी ज्या जाणीवेला ते ईश्वर रूप संबोधतात त्याच जाणीवेला ते उत्तरपक्षामध्ये लबाड म्हणतात. या विरोधाभासाकडे सत्यशोधक साधक मित्रांनी विवेकाने आणि प्रज्ञेने पाहणे आवश्यक आहे अन्यथा श्री महाराजांची बोधवाक्ये त्यांना अजुनच संभ्रमात टाकतील. खरं तर सत्य हे आपले स्वरुप आहे आणि ते शब्दातीत आहे, सर्वसमावेशक आहे तसेच विरोधाभासीही आहे. कोठ्ल्यातरी दृष्टीकोनातून त्याचे वर्णन करायला गेले कि त्याचे एक अंग अभिव्यक्त होते. दृष्टीकोन बदलताच त्याची अभिव्यक्ती बदलून जाते. ती नुसतीच बदलत नाही तर ती पूर्ण विरोधाभासपूर्ण वाटू लागते. ह्यासाठी सत्याकडे सर्वांगाने बघणे आवश्यक आहे. असे पाहण्याने सर्व विरोध मावळून जातात, संभ्रम मिटतात आणि हेच सत्य आपलेच स्वरुप म्हणून कायमचे उघड होते.
ज्याप्रमाणे डॉक्टर रोग्याच्या आजाराप्रमाणे त्याला औषधांची मात्रा देतो. ज्याप्रमाणे नवजात अर्भकाला शुद्धरुपामध्ये दूध दिले जाऊ शकत नाही त्याच प्रमाणे ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि आकलन शक्ती प्रमाणे त्याला ज्ञान मार्गदर्शन मिळत जाते अथवा दिले जाते.
एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध, अभ्यासातून झालेला बोध, शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेल मधील मेनूकार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थांची पाकक्रीया पाठ होण्यासारखे आहे. ह्यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते पण ‘भूक’ मात्र नक्कीच भागत नाही. विविध शात्रांचा, ग्रंथांचा अभ्यास जास्तीच जास्त काय देउ शकतो तर पांडित्याची एखाधी मोट्ठी पदवी किंवा एखादा पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा. पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही... त्याने आपल्याला आपल्या 'कायम' स्वरुपाचा बोध मात्र नाही मिळत. जे बुद्धीच्या अलिकडचे आहे ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय कळणार ! हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान', वास्तविक ‘ज्ञान आणि अज्ञानाच्या अलिकडे व पलिकडे’ असलेल्या आपल्या खर्या कायम स्वरुपापर्यंत कधीच पोचू शकत नाही. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान' फक्त मूळ सदवस्तूकडे, स्वरूपाकडे निर्देष करण्यापर्यंतच कामाचे आहे हे ‘जाणले’ तरी स्वरूपबोध ‘उघड होण्यास’ यत्किंचीतही वेळ लागू शकत नाही. दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध, स्वरुप-बोध. आपल्याच अनंत आणि निराधार स्वरुपाचा बोध. हा आत्मबोध म्हणजे शून्याच्या पाढ्यासारखा बोध. शून्याचा पाढा कोणीही कधीतरी पाठ करतो का हो! हा बोध म्हणजेच अकारण आनंद, येथे आहे सहज विश्रांती.
'आत्मप्रेम' निमित्ताने सुरु झालेल्या ह्या आध्यात्मिक प्रेमयात्रेसाठी साधकमित्रांना अनेक शुभेच्छा.
'आत्मप्रेम' वाचताना एकावेळी काही निरुपणे/बोधवाक्ये वाचून त्यावर स्वतंत्र चिंतन, मनन झाल्यास साधकांना स्वरूपबोध ‘उघड होण्यास’ नक्कीच सहज आणि सुलभ होईल ह्यात यदकिंचितही शंका नाही. आत्मप्रेम मधील श्री निसर्गदत्त महाराजांच्या वचनांच्या दुधारी तलवारीच्या वारामधून कोणीही साधक न वाचो ही सदिच्छा. जो साधक ह्या वारातून आपला बचाव करणार नाही तो खर्याअर्थाने कायमचाच वाचेल हे निश्चीत आहे.
'आत्मप्रेम' मधील श्री निसर्गदत्त महाराजांच्या निरुपणांचे मूळ संकलक गुरुबंधू श्री दिनकर केशव क्षीरसागर ह्यांचे आठवणरुपी अनेक आभार. आत्मप्रेमचे संपादक व प्रकाशक मित्र आणि गुरुबंधू श्री रवींद्र कात्रे आणि त्यांचे सहकारी ह्यांनी घेतलेल्या अथक आणि गोड परिश्रमाबद्द्ल अभिनंदन. येथे ही प्रस्तावना लिहिण्यास प्रवृत्त करून ती लिहून घेतल्याबद्दल सदगुरु श्री निसर्गदत्त महाराजांना शतषः प्रणाम. जय गुरु.
सप्रेम नमस्कार.
-नितीन राम
www.abideinself.blogspot.com