"शब्दा"चे विसर्जन---तोच "निशब्द"
निशब्दाचे मूल्...'शब्द', तर... शब्दाचे मूळ्...'निशब्द' ! 'शब्दा'ला दिसेल फक्त 'शब्द'च , तर.....निशब्दाला...फक्त 'निशब्द'! 'शब्दा'ला जसा 'निशब्दातही दिसतो फक्त शब्द...तसा 'निशब्दा'ला शब्दातही दिसतो फक्त 'निशब्द'! 'शब्दा'ला कसां बरं ओळखू येइल "निशब्द", झोपलेल्याला कधीतरी कळते का..कोण जागा झाला आहे ते… आणि तेही 'बुद्धीचा चश्मा' लावून !! इन-मिन पाच माणसे होती जी तेव्हा देहाकृतीतील कृष्णाच्या अनंत परब्रह्म स्वरुपाला ओळखत होती आणि बाकीची सर्व मात्र कृष्णाच्या आधीच्या देवतांचीच पूजा करत होती ना!!! आणि आता मात्र अनंत आहेत जी त्याची ईश्वर म्हणून पूजा करताहेत! गंम्मत आहे ना !! ;-)
'शब्दा'ला दिसतो जेव्हा 'निशब्दा'तील 'शब्द' आणि सुरु होते जमावलेल्या शब्दांची वळवळ....ऐकलेल्या, वाचलेल्या अनुभवरहीत 'शब्दांची' चुळबुळ! आणि मग 'शब्दाची' शब्दावरील 'अढळ भक्ती' कधी पाहूच शकत नाही 'निशब्द'! 'शब्दा'ला कायमच झोंबतो हा 'निशब्द' कारण शब्द जर राख तर "निशब्द" आहे चेतलेला अग्नि! 'शब्दा'साठी भय काय आहे तर समर्पणाचे ….नसलेले अस्तित्व मिटण्याचे!! मरतो कोण तर हाच जडबुद्धी 'शब्द' जो अनंत वाहणार्या 'निशब्दा'च्या प्रवाहात बुद्धीच्या किनारर्याला घट्ट पकडून बसला आहे. त्याला कधी लक्षातच येत नाही कि प्रवाहाला कायमच दोन किनारे असतात. एक ज्ञानाचा तर दुसरा प्रेमाचा, श्रद्धेचा, भक्तीचा ! एका किनार्याची वाहती नदी कधी कोणी पाहिली आहे का!!! गोलाकार अश्या एका किनार्याचे असते… ते स्थिर, मृतवत 'डबके'..त्यात प्रवाह नाही, जीवंतपणा नाही!
‘शब्द’ आहे कोरडे बीज जे कधी उमलतच नाही कारण उमलण्यासाठी लागतो ओलावा, प्रेमाचा. श्रद्धेचा! शब्दाला शब्द जोडला जातो फक्त आणि उरते फक्त शब्दांची बेचव, बेरस खिचडी, ज्याने कोणाचेच कधीच पोट भरलेले नाही! खिचडीची पाकक्रिया वाचून, पाठ करून, पुनरावृत्ती करून कधी कोणाचे पोट भरलेले ऐकलेले तर नाहि !!!!
एकूण काय तर ‘शब्दा’ला भय आहे हे मरणाचे......आणि मरण्याशिवाय वास्तविक "जन्म" कधीही कोणाचाही झालेलाच नाही ! 'शब्दा'ला जेव्हा कोठल्यातरी अज्ञात क्षणात झोंबतो हा 'निशब्द' तेव्हा होते एक जखम आणि 'शब्द' पुन्हा माहितीवजा शब्दांचे मलम लावून त्याला भरायचा असफल प्रयत्न करतो आणि उमलण्याचा एक सुंदर क्षण पुन्हा हातातून निघून जातो.
शब्दाला कायमच भय आहे 'निशब्दाचे. 'शब्दाला' भय आहे जखमेचे/पीडेचे आणि म्हणून तर तो 'निशब्दा'पासून लांब लांब पळत राहतो. पण श्रद्धेच्या अभावी त्याला दिसूच शकत नाही….
त्याला कधी ल़क्षातच येत नाही कि जखम करणारा हाच तर 'सदगुरु'! जखम करतो आहे असे जरी वाटले तरी तो वास्तविक जखम भरायचे काम करत असतो. नसलेल्या रोगाची जखम...अनावश्यक धारणांची, मान्यतांची जखम!
दिवाणखान्यात लटकवलेली...प्लैस्टिकच्या फुलांच्या 'शाश्वत' हाराने सुशोभित केलेली सदगुरुंची सुंदर तसवीर म्हणजे फक्त "सदगुरु" आहेत की काय !!!!! जेथे जेथे होते जखम/पीडा (शारिरीक नव्हे) तेथे तेथे …तेच सदगुरुंचे चरण! जखमेपासून लांब पळून पळून थकून नाही गेला का अजून हा 'शब्द'!!? शब्दांच्या ढाली घेऊन किती वेळ आणि कोठे कोठे पळत राहणार हा 'शब्द'!? जमवलेल्या शब्दांची पोती डोक्यावर घेऊन पुन्हा दारो-दारी नवीन शब्द गोळा करीत बोहारणीसारखा का फिरतो आहे हा 'शब्द'!!!
'शब्द' आणि 'निशब्दा'मधे अडथळा तरी काय आहे...अडचण काय आहे तर ती म्हणजे 'शब्दा'ची'..'शब्दा'वरील अढळ श्रद्धा! शब्दांच्या ढाली घेउन, शब्दांचे अलंकार घालून इकडे-तिकडे चौफेर पळणार्या 'शब्दा'ला कृष्णच काय...राम...बुद्ध...रमण...रजनिश...जीसस..निसर्गदत्त ह्यांसारखे "निशब्द"....काहीही करू शकत नाही. 'शब्दा'च्या अंगावरील अनंत भेगा, फटी त्यांना दिसत नाहीत असे नाही...पण जो पर्यंत 'शब्दा'मध्ये धाडस, धैर्य्, वास्तविक तहान, आंतरिक श्रद्धा.....दिसत नाही तो पर्यंत ते करुणेने वाट पहात राहतात. एकूण काय एका क्षणाचेच तर काम आहे...जशी शब्दाची शब्दावरील अढळ भक्ती स्वानुभवाने ढळणार तसे 'शब्दाचे' आपसुकच होणार विसर्जन, 'शब्दाचे' निशब्दाच्या पायी समर्पण.
वास्तविक 'जखम' हीच तर आहे 'औषधी'… हाच तर आहे खरां रामबाण उपाय !! जखम जेव्हा आंतरिक जाते तेव्हा तिच स्वतः औषध बनून प्रकट होते आणि मग कायमचाच रोग नाहिसा होतो आणि प्रकट होते खरे "स्वास्थ्य्".."स्व-स्थित" !!! :-)
सदगुरुकृपेने एका अज्ञात क्षणी...'निशब्दाच्या' अनंत, अथांग प्रवाहात वाहून जातो तो 'शब्द'....कायमचाच्...आणि उरतो फक्त "निशब्द"! आपलिची डोई आपल्या पायी! :-)
'शब्द' आणि 'निशब्दा'चा विस्तृत आणि व्यर्थ वाटणारी ही वायफळ चर्चा कशासाठी....! :-) शब्दातूनच सदगुरुकृपेने कधी कधी निघते एक वाट्..जी घेऊन जाते 'शब्दा'ला आपल्या मूळ 'स्वगृही'....'निशब्दा’मधे ! :-)
!जय गुरु!
सप्रेम
-नितीन राम
०५ जुलै २०१०