मित्र: एखाद्याचा बोध निव्वळ शाब्दिक नाही हे समजण्याचा नेमका निकष नाही. त्यामुळे साक्षात्काराचे दाखले देत वावदूकाने विद्वानांची थट्टा करावी असा प्रघात रूढ होतो आहे (उदा. ओशो). असो....आपला लेख* आवडला.
नितीनः धन्यवाद अज्ञात मित्र! आपल्या ह्या वैयक्तीक मत प्रदर्शनाबद्दल आभार आणि आपले येथे सप्रेम स्वागत. हा ब्लॉग सर्वांसाठी आपापले दृष्टीकोन मांडण्यासाठी मोकळा आहे.
सत्याचा कधीही आणि कोठलाही आग्रह असू शकत नाही. असत्याचा मात्र कायमच कोठला तरी आग्रह असतो अन्यथा असत्याच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह् लागू शकते. सत्याचा निकष लावणे स्वाभाविकच अशक्य आहे कारण हा निकष लावणार तरी कोण! "सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे. "सत्य" स्वतःचेच "स्वरूप" म्हणून कायमचे उघड झाल्याशिवाय ते शक्य नाही. पण गंम्मत आशी आहे की हे उघड झाल्यावर एकतर त्याचा निकष लावायची गरजच मुळी ऊरत नाही आणि दुसरे म्हणजे कोणी त्याचा निकष लावायला जरी गेले तरी त्याचे देखील दु:ख वाटत नाही. :-) ! पुनश्चः आभार!
मित्र: नितीन रामजी, सप्रेम नमस्कार आणि धन्यवाद. आणखी थोडे मत प्रदर्शन करतो. आग्रह कसलाच नाही. प्रकाशित करण्यायोग्य वाटले तर अवश्य प्रकाशित करा.
१. अध्यात्माचा 'मी आणि माझी मुक्ती' आणि बोध होणे, ज्ञान होणे इतकाच मर्यादित, संकुचित पाया नाही. त्यापुढे भगवद्गीता ३.२५ - ३.२६ हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण लक्षात कोण घेतो? त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली सगळीकडे तथाकथित 'अपनी धून मे मस्त' धीन्गाड्या 'मुक्तात्म्यांचा' धिंगाणा चालू आहे.
२. सत्याचा बोध झालेला नैतिक आणि अनैतिक याच्या पलीकडे असतो हे तत्वत: खरे आहे. पण असे देही असोनी विदेही उन्मनी मुक्तात्मे विरळेच असतात. त्यामुळे परिपूर्ण धर्मविचारात निव्वळ अमूर्त संकल्पना, 'फक्त बोध हवा, बास' इतकेच पुरेसे नाही. त्याची परिणती कळत नकळत सामान्यांचा बुद्धिभेद होणे, देव देश आणि धर्म यासाठी कार्य करणार्यांचे नाहक अवमूल्यन होणे आणि बसल्या जागी विश्वात्मक बुद्धी करत भोगलोलूप, पिसाट, धूर्त, आणि बोलबच्चन दुकानदारांनी अध्यात्मातले अध्वर्यू म्हणून मिरवणे यात होते. असो....
नितीनः पुन:श्च्च धन्यवाद आणि आपले हार्दिक स्वागत. आपल्याला अभिप्रेत जे अध्यात्म आहे किंवा आपली जी आध्यात्माची व्याख्या आहे त्या विषयी मी काहीही जाणत नाही. आपला निश्चीतच त्याचा अभ्यास आहे त्यामुळे आपले निरिक्षण कदाचित आपल्या दृष्टीकोनातून बरोबरही असू शकते.
प्रत्येक साधकाच्या विविध अशा पारमार्थिक धारणा, संकल्पना, मान्यता असतात. ह्या धारणांच्या आधारावरच ज्याचा-त्याचा तथाकथित पारमार्थिक शोध चालू असतो. प्रस्थापित धारणांना शक्यतो धक्का लागू न देता शोध घ्यायचा असा बहुतांश साधकांचा आटोकाट प्रयत्नही असतो. हा शोध अनेक मार्गांने, साधनांद्वारे चालू असतो. कोणी ग्रंथ, शास्त्र, पुस्तक, वचने ईत्यादी वाचन करतो तर कोणी नित्यनेम, जप-तप, ध्यान, योग अशा अनेक क्रिया अनुसरतो. अधिकतर साधकांचा 'क्रियेवर, आलंबनावर', साधण्यावर' विश्वास असतो तर फारच थोड्या साधकांची 'मी कर्ता' ह्यावरच दाट संशय असतो. येथे व्यक्ती तितक्या प्रकृती, जितक्या प्रकृती तितके दृष्टीकोन आणि जितके दृष्टीकोन तितके अंगुलीनिर्देष आणि जितके दृष्टीकोन तितक्याच विभिन्न अभिव्यक्ती! असो…
गीता असो वा दासबोध अथवा अजून कोणताही धर्मग्रंथ, गुरुकृपेने मी कधीही हे वाचलेले नाहीत. पण ह्याच गुरुकृपेने, गुरुआशीर्वादाने... हे सारे धर्मग्रंथ मी लिहिलेले नाहीत असे मी म्हणू शकत नाही. कृष्णाने काय सांगितले, काय उपदेश केला ह्या पेक्षा कृष्णाने काय जाणले हे माझ्यासाठी कायमच लक्ष राहिले. कृष्ण जे काही सांगतो आहे ते "कोणाला" सांगतो आहे "त्याकडे" लक्ष राहीले. असो. कृष्णाने सांगितलेली गीता 'आपण अर्जुन आहोत' असे समजून सर्वच वाचतात पण हि गीता आपलीच हकिकत आहे, आपल्याच स्वरुपाची म्हणजेच कृष्णाचीच कथा आहे असे समजून वाचणारा अगदीच दुर्मिळ. असो….जय गुरु......
आपल्या दृष्टीने "देही असोनी विदेही उन्मनी मुक्तात्मे विरळेच असतात". हि देखील मुक्तात्म्यांविषयी एक धारणाच झाली ना! पण तेही स्वाभाविकच आहे. मुक्तात्म्यांना त्यांच्या कृतीवरून ओळखणे हे तर मूळ अज्ञान! आज हजारो वर्षांपासून कृष्णाची गीता वाचली जाते आहे पण कृष्ण देहाकृतीमध्ये असताना केवळ बोटावर मोजता येतील इतकी माणसे होती ज्यांची कृष्णाच्या परमात्म स्वरुपावर श्रद्धा होती. कोणी सांगावे, त्यावेळच्या बाकी सर्वांना कृष्णाच्या लिला आणि युद्धातील सहभाग नक्कीच सलला असावा. त्यांचे कृष्णाच्या 'वर्तनावरच' लक्ष गेले असावे. लक्ष कोठे आहे त्यावर काय दिसणार हे निश्चीत असते. रुपाला रूपच आणि गुणाला गुणच दिसणार ना!. रूप अरूपाला आणि गुण निर्गुणाला कसा काय पाहणार हो! आपल्यासाठी आपण काय आहोत ह्या मान्यतेवरच आपण इतर कोणालाही ओळखू शकतो. जणू आपल्याला असलेली आपली ओळख हा आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीला/वस्तूला ओळखण्यासाठी एक प्रकारचा चश्मा म्हणून काम करतो. :-) सर्वांना सर्व रुचावे, आवडावे अशी अपेक्षाही नाहीये! असो….
पूर्वपक्षातील साधकांची देहरुप म्हणजेच आपण हि दृढ श्रद्धा, कार्यकारणावर असलेली श्रद्धा पाहून विविध आलंबने दिली जातात. जो पर्यंत साधकाच्या ठायी 'मी आहे' ह्या सहज स्फुरलेल्या जाणीवेबरोबर 'मी वेगळा' आहे हे भान आहे तो पर्यंत त्याला कोठल्याही क्रियेचे आकर्षण आहे, काहि तरी मिळवायची चिंता आहे, कोठेतरी पोचायचे आहे आणि तोपर्यंत त्याला विविध साधने आणि आलंबने दिलेली आहेत. दुसर्या स्तरावरील एक साधक आहे ज्याची कोणत्याही साधनेद्वारे असो अथवा अवचितच पण स्वत;च्या अनुभवातून "देह आपण" ही श्रद्धा ढळलेली आहे किंवा आपले देहरुप हे आपले मूळस्वरूप नाही हे ज्याला उमजलेले आहे, त्याच्यासाठी उत्तरपक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे.
कृष्णाने उद्धवाला सुरवातीला पूर्वपक्षातले ज्ञानमार्गदर्शन केले आणि एक वेळ अशी आली कि कृष्णाने हे जे आत्तापर्यंत उद्धवाला दिलेले ज्ञान होते ते विसरून जायला सांगितले. स्वाभाविकपणे उद्धव बेचैन झाला, अस्वस्थ झाला आणि मग त्याला कृष्णाने अंतिम म्हणजेच उत्तरपक्षातील ज्ञान (अंगुलीनिर्देष) दिले आणि उद्धव कायमचा मोकळा झाला. उद्धवाला कृष्णाने दिलेल्या उत्तर पक्षामधील ज्ञानाबरोबर त्याचे कृष्णावर निस्सिम प्रेम व अपार श्रद्धा होती हे पण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
ह्या प्रेमाच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या नैसर्गिक वंगणामुळे कृष्णाने दिलेल्या अंतिम ज्ञानाबाबत विवेक करणे उद्धवाला सहज आणि सुलभ झाले. अंतिम अवस्थेत जर ज्ञानातून शुद्ध प्रेम उपजत नसेल तर ते ज्ञान केवळ शाब्दीकच ज्ञान ठरते आणि ते साधकाला कायमचे मोकळा करण्यास असमर्थ ठरते. ज्याप्रमाणे प्रेमाची पूर्णता हे आत्मज्ञानाचे अवतरण त्याचप्रमाणे ज्ञानाची पूर्णता म्हणजे शुद्ध प्रेमाचे अवतरण ! पूर्वपक्षामधे जरी ज्ञान व प्रेम हे दोन्ही वेगळे घाट, मार्ग दिसत असले तरी उत्तरपक्षामध्ये हे दोन्ही आपल्याच स्वरुपाचे अविभाज्य अंग म्हणून उघड होतात आणि त्यांमधील भासमय द्वैत सहजच विरून जाते. उत्तरप़क्षामध्ये सर्व काम फक्त विवेकाचे आहे. पुन:श्च्च आपले आभार आणि सप्रेम नमस्कार! जय गुरु......
-नितीन राम
जेथे ओळख पटली तेथे ओळख संपली.
Picture Courtesy: Maya Love